डोळ्यांची नियमित काळजी (Regular Eye Care)

डोळ्यांची नियमित काळजी

ये काली काली आंखे… हे गाणे सर्वांनी एकले आहे. मात्र, याच डोळ्यांची काळजी घेण्याची जेव्हा वेळ येते; तेव्हा आपण सपेशल दुर्लक्ष करतो. डोळे हा फार नाजूक अवयव आहे. वाढत्या वयात तर ते अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे लहानग्यांचा आहार चांगला असावा. ‘व्हिटॅमिन ए’ युक्त आहार म्हणजे हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा गर, पपई, संत्रे इ.चे नियमित सेवन करावे. जर लहानग्यांच्या डोळ्यात नेहमी पाणी येत असेल किंवा तिरळेपणा जाणवत असेल तर नेत्रविकाररोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. बाळाने ए-बी-सी-डी वाचण्यास सुरू केले की, डोळ्यांची नियमित तपासणी करावी. वयाची पहिली दहा वर्षे डोळ्यांच्या वाढीसाठी फार महत्त्वाची आहेत. या वयात डोळ्यांची वाढ योग्य झाली नाही तर ते नेहमीसाठी कमजोर होतात; लेझी आय सारखे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे आई वडिलांनी मुलांच्या डोळ्याची नियमित तपासणी करवून घेण्यास प्राधान्य द्यावे.
अलिकडे ‘स्क्रीन टाईम’ वाढला आहे. संगणक, टीव्ही वा मोबाईलच्या वापरामुळे डोळ्यांचा कोरडेपणा वाढतो. त्यावर उपाय म्हणून एका तासाच्या कामानंतर डोळ्यांना किमान पाच मिनिटे विराम द्यावा. पापण्या लवण्याचे प्रमाण वाढवा. त्रास जास्त असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने लुब्रिकेंट आय ड्रॉप वापरू शकता. संगणकाच्या स्क्रीनला एंटीग्लेअर कोटिंग करावे अथवा एंटीग्लेअर चष्मा वापरण्यास हरकत नाही.
घराबाहेर पडताना डोळ्यांवर ‘सनग्लासेस’ अत्यावश्यक आहे. कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर हा वापर क्रमप्राप्तच आहे. अतिनिल किरणांपासून (अल्ट्राव्हॉयलेट रेज्) 99 ते 100 टक्के संरक्षण करणार्‍या सनग्लासेस वापरण्यास प्राधान्य द्यावे. अन्यथा मोतीबिंदू अथवा मॅक्युलर डिजनरेशन सारखे डोळ्यांचे विकार उद्भवण्याची शक्यता वाढते. शिवाय सनग्लासेसमुळे धुळ आणि छोट्या किटकांपासून रक्षण होईल.
डॉक्टरांच्या सल्ल्याविना, मेडिकल स्टोअरमधून घेतलेले आणि स्टिरॉईडराखखे घटक असणारे आयड्रॉप्स डोळ्यांसाठी हानीकारक ठरू शकतात. त्यामुळे डोळ्यांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. फॅक्टरीमध्ये, वेल्डिंग आदी कामे करताना डोळ्यांची काळजी घ्यावी. योग्य काळजी न घेता काम करणे, हे डोळ्यांच्या दीर्घकालीन विकारांचे एक महत्त्वाचे कारण आहे.
मधूमेहाचा डोळ्यावर परिणाम होत असल्याने रुग्णांनी नियमित डोळ्याची चाचणी करणे अत्यावश्यक आहे. याशिवाय चाळीशीनंतर जवळचा चष्मा लागण्याची शक्यता असल्याने नियमित डोळे तपासावे. वयाच्या पन्नासीत काचबिंदू व मोतीबिंदू रोग होण्याची शक्यता वाढते. काचबिंदू तर ‘सायलेंट किलर’ आहे. हळूहळू मंजातंतू कमकुवत झाल्याने दृष्टी कमी होऊन कायमचे अंधत्व देखील येऊ शकते. त्यामुळे पन्नासीनंतर डोळ्यांची तपासणी करणे, म्हणजे डोळ्यांची काळजी घेणेच होय.
डोळ्यांनी धुसर दिसत असेल, काम करताना डोळ्यांवर ताण पडत असेल, फोकस करण्यास त्रास होत असेल, डोळे कोरडे होत असतील, डोळे लाल असतील तर डोळे तपासावे. कदाचित चष्मा लागू शकतो, नंबर बदलू शकतो किंवा कुठले अन्य विकार आहेत हे कळू शकते. त्यामुळे लवकरात लवकर उपचारास सुरुवात होऊन पुढील गुंतागुंत टाळता येते. आहारही समतोल असावा. वजनावर नियंत्रण असले तर डोळ्यावर कमी दबाव येतो; म्हणून वजन नियंत्रणात असावे. धुम्रपान टाळावे, नियमित व्यायाम करावा, आणि मोठ्यांनी वर्षातून एकदा तर लहान्यांनी सहा ते आठ महिन्यातून एकदा डोळ्यांची तपासणी करावी.
डोळे फार अमुल्य आहेत. डोळ्यांच्या आजारासोबत कुठलीही तडजोड करू नये, ‘नंतर जाऊ नेत्ररोगतज्ज्ञाकडे…!’ अथवा ‘बघून घेऊ..काय होत…!’ असा दृष्टीकोन ठेवू नये. डोळ्यांची नियमित काळजी घ्या आणि दृष्टीचे रक्षण करा.
best Ophthalmologist Surgeon in Nagpur - Dr. Nita D. Rathi
डॉ. नीता राठी, नेत्ररोगतज्ज्ञ, नागपूर 
(Regular Eye Care is important to prevent severe eye problems; Article by Dr. Nita Rathi)