मधूमेह आणि डोळा

मधूमेह आणि डोळा

अलिकडल्या काळात जीवनशैलीचे विकार वाढत आहेत. त्यामध्ये मधूमेहाचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र, आजही समाजात मधूमेह आणि डोळ्यांच्या विकारांच्या संबंधांबद्दल फारशी जागृती नाही. खरं सांगायचं तर मधूमेह या रोगाचा डोळ्यांवर दुरगामी परिणाम होतो. मधूमेहाने ग्रसित असलेल्या रुग्णांना डोळ्यांचे विकार होण्याची संभावना सामान्य व्यक्तींपेक्षा जास्त असते. मधूमेहामुळे डायबिटिक रेटिनोपैथी, मेक्युलोपैथी, कमी वयात मोतिबिंदू अथवा काचबिंदूसारखे विकार जडू शकतात.
जेव्हा रक्तशर्करा फार कालावधीसाठी अनियंत्रित असते, तेव्हा रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतीवरील पेशींची हानी होते. किंबहुना त्या मृत पावतात आणि त्या रक्तवाहिन्यांमधून रक्त आणि प्लाजमा बाहेर झिरपू लागते. ते डोळ्यांच्या पडद्यासमोर येण्याची शक्यता वाढते. यास डायबिटिक रेटिनोपैथी म्हणतात.
साधारणपणे डायबिटिक रेटिनोपैथीचे दोन स्तर(स्टेज) असतात. एक म्हणजे प्राथमिक अवस्था. त्यास प्रि-प्रॉलिफरेटिव्ह रेटिनोपॅथी असे म्हणतात. त्यामध्ये रेटिनाच्या छोट्या रक्तवाहिन्यांची हानी होते आणि रक्त व प्लाझमा डोळ्यात पाझरायला लागते. अशा वेळी रुग्णास कुठली लक्षणे आढळून येत नाहीत.
त्यानंतर याचा दुसरा टप्पा म्हणजे प्रॉलिफरेटिव्ह रेटिनोपॅथी. रक्तवाहिन्यांची हानी झाल्याने डोळ्यांच्या पेशींपर्यंत आवश्यक घटकद्रव्ये पोहचत नाहीत. त्यामुळे रेटिनाच्या आसपास नव्या रक्तवाहिन्या बनू लागतात. या नव्या रक्तवाहिन्या तुलनेने कमजोर असल्याने त्यांना क्षती पोहचते व त्यातून रक्त निघू लागते. ते डोळ्यांच्या पडद्यासमोरील जेलीमध्ये जमा झाल्याने रुग्णाच्य्या दृष्टीला हानी पोहचते. शिवाय या नव रक्तवाहिन्यांमुळे अत्याधिक तणाव निर्माण होऊन ‘रेटिना डिटॅचमेंट’ म्हणजे डोळ्यांचा पडदा सरकू शकतो. शिवाय जेव्हा द्रव्य पाझरून ते रेटिनातील प्रतिमा निर्माण करणार्‍या मॅक्युलासमोर येतात; तशा परिस्थितीत कायमचे अंधत्व येऊ शकते. पहिल्या स्तरात डायबिटिक रेटिनोपैथीचे लक्षण आढळून येत नाहीत. दुसर्‍या स्तरात त्याची लक्षणे आढळून येतात.
डायबिटिक रेटिनोपॅथीचा उपचार करण्यासाठी डोळ्यांची संपूर्ण तपासणी आवश्यक आहे. तपासणीसाठी ‘इन्डायरेक्ट ऑप्थेलमोस्कोप’चा वापर करण्यात येतो. त्यात काही शंका आली तर फ्लोरिसिन एंजियोग्राफी करण्यात येते. त्यामुळे रक्तवाहिन्या कुठून गळत आहेत, हे उमगते. रक्तवाहिन्यांमध्ये गळती असेल अथवा अतिरिक्त रक्तवाहिन्यांची निर्मिती झाली असेल, तर लेजर उपचार करणे क्रमप्राप्त आहे. लेजर फोटोकॉग्युलेशनमध्ये एक शक्तीशाली लेजर-किरण प्रभावित भागावर पाडल्या जाते. त्यामुळे तेथील रक्तवाहिन्यांची गळती थांबते. तसेच अतिरिक्त रक्तवाहिन्यांची निर्मितीला लगाम लागतो. अनेकदा डायबिटिक रेटिनोपॅथी नियंत्रणाबाहेर गेली असते. अशा वेळी ‘माईक्रोसर्जिकल ऑपरेशन’ म्हणजे ‘वीट्रेक्टॉमी’ करावी लागते. त्यामध्ये डोळ्यांमध्ये जमा झालेले रक्त हटवून पुन्हा दृष्टी प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतो. शिवाय रेटिनल डिटॅचमेंट झाले असेल, म्हणजे डोळ्यांचा पडदा सरकला असेल तर शस्त्रक्रिया करूनत यास जागेवर आणल्या जाते.
मोतिबिंदू सारखे विकार उतार वयात होत असले तरी मधूमेहाच्या रुग्णांमध्ये युवावस्थेमध्ये हे विकार उद्भवू शकतात. शिवाय मधूमेहामुळे डोळ्यांचा पक्षाघात होऊ शकतो. त्यामुळे डोळे तिरळे होण्याचा धोका संभवतो. हे सगळं टाळण्यासाठी मधूमेहग्रस्त रुग्णांनी डोळ्यांची नियमित तपासणी केली पाहिजे. किमान वर्षातून एकदा तरी अत्यावश्यक आहे. ज्यांना उतारवयात मधूमेह आढळला आहे त्यांनी तर सहा महिन्यातून एकदा डोळ्याची तपासणी करावी. पूर्वनिदान झाल्यास मधूमेहामुळे होणार्‍या डोळ्यांच्या समस्यांवर मात करू शकतो आणि दृष्टीचे पूर्णपणे रक्षण करू शकतो.
best Ophthalmologist Surgeon in Nagpur - Dr. Nita D. Rathi
डॉ. नीता राठी, नेत्ररोगतज्ज्ञ, नागपूर
(Regular Eye Care is important to prevent severe eye problems in Diabetis; Article by Dr. Nita Rathi)