मोतिबिंदू (Cataract)

मोतिबिंदू

मोतिबिंदू डोळ्यांचा सामान्यपणे आढळणारा विकार आहे. परिवारात आपल्याला मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करवून घेणारे काका-मामा-आज्जी नक्कीच भेटले असतील. शिवाय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया लेजरद्वारे केली असेही अनेकांकडून ऐकले असेल. आज आपण मोतिबिंदू म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया..
आपल्या डोळ्यात प्रतिमा निर्मिती होण्यापूर्वी प्रकाशकिरणे तीन स्तरातून जातात. पहिला म्हणजे कॉर्निया; ज्यास आपण डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडता म्हणतो. त्यानंतर दुसरा स्तर म्हणजे त्यामागे असलेली ‘लेन्स’. या लेन्समुळे प्रकाशकिरणे एकत्र येऊन रेटिनावर म्हणजे डोळ्यातील पडद्यावर आदळतात आणि आपणास प्रतिमा(इमेज) दिसू लागते.
विशिष्ट वयात अथवा काही कारणांमुळे लेन्समधील फायबर पांढूरके (व्हाईट) व्हायला लागतात. आणि प्रकाश किरणे रेटिनापर्यंत पोहचण्यास अडथळा येतो. त्यामुळे व्यक्तीस धुसर दिसू लागते. एखाद्या पारदर्शक काचेवर अथवा चष्म्यासमोर वाफ जमा झाली की, जसे दिसते तसं काहीसं दिसू लागतं. मग वाचन करताना, दुरचं अथवा जवळचं बघताना त्रास होतो. काही दिवसांनी सगळं धुसर दिसू लागतं.
मोतिबिंदू होण्यासाठी ‘वय’ एक कारणीभूत घटक आहे. साठीच्या आसपास मोतिबिंदू होण्याची शक्यता बळावते. याशिवाय कुठल्याही सुरक्षेविना नियमित अतिनिल किरणांच्या संपर्कात आल्याने, स्टिरॉईड या संप्रेरकाचा औषधे वा अन्य कुठल्याही माध्यमातून वापर केल्याने, डोळ्याला मार लागला तर (ट्रॉमेटिक कॅटरॅक्ट), मधूमेह यामुळे मोतिबिंदू होऊ शकतो. शिवाय जन्मतः देखील मोतिबिंदू होऊ शकतो; बाळ गर्भात असताना आईला आजार झाला असेल, कुठल्या औषधांचे सेवन केले असेल अथवा अनुवांशिक कारणांनी जन्मतः मोतिबिंदू संभवतो.
मोतिबिंदूंचा उपचार केवळ चष्मा परिधान केल्याने होत नाही. पूर्वी डोळ्यास 10 मिलीमीटरचा चिरा करून ही शस्त्रक्रिया केल्या जात असे. मात्र, अलिकडल्या काळात ही शस्त्रक्रिया सोपी झाली आहे. मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करण्याची सर्वात महत्त्वाची आणि सुरक्षित उपचार पद्धती म्हणजे ‘फेको सर्जरी’.
या शस्त्रक्रियेमध्ये डोळ्यास 2 मिलिमीटरचे छोटे छिद्र करण्यात येते. त्यातून ‘अल्ट्रासोनिक प्रोब’ आत घालण्यात येतो. हा प्रोब तेथे कंपन तयार करून तेथे असलेले डोळ्याचे लेन्सला ओढून घेतो. त्याच छोट्या छिद्रातून फोल्डेबल लेन्स आत घालण्यात येतात. आणि ती लेन्स आधीच्या लेन्सची जागा घेते. ही लेन्स अर्थात त्यावेळेस व्यक्तीच्या चष्म्याचा नंबर काय आहे(रिफ्रेक्टिव्ह एरर), त्याचा अभ्यास करून तयार केली असते. त्यामुळे चष्म्याचा नंबरही कमी होतो. या प्रक्रियेस फेको इमल्सिफिकेशन असे म्हणतात.
शस्त्रक्रियेमुळे झालेली जखम भरायला कमी दिवस लागतात. रुग्णाला शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही तासातच सुटी होते. शिवाय सुंगणी देण्यासाठी ‘अ‍ॅनेस्थेटिक ड्रॉप’ वापरल्याने पूर्वीसारखा इंजेक्शनमुळे त्रास कमी झाला आहे. मात्र, शस्त्रक्रियेनंतर आवश्यक सावधगिरी बाळगायला हवी. डोळ्यांना वारंवार हात लावू नये, डोळे चोळू नये, हात स्वच्छ असेल तरच डोळ्यांना हाताचा स्पर्श करावा, अशा काही बाबी ध्यानात ठेवाव्या.
मोतिबिंदू होऊ नये म्हणून अ‍ॅन्टिऑक्सिडेंटयुक्त आहार सेवन करावा. अतिनिल किरणांचा नियमित संपर्क आणि धुम्रपान टाळावे, मधूमेहावर नियंत्रण मिळवावे शिवाय मेडिकल स्टोअरमधून आणलेली स्टिरॉईडयुक्त डोळ्यांचे ड्रॉप टाळले पाहिजे. आणि नियमित डोळ्यांची तपासणी करावी.
best Ophthalmologist Surgeon in Nagpur - Dr. Nita D. Rathi
डॉ. नीता राठी, नेत्ररोगतज्ज्ञ, नागपूर
(Regular Eye Care is important to prevent severe eye problems; Article by Dr. Nita Rathi)