लहान मुलांमध्ये चष्म्याचे वाढते प्रमाण...!
लहान मुलांमध्ये चष्म्याचे वाढते प्रमाण
हल्ली लहान वयातच चष्मा लागतोय्. शाळेत डोळ्यांची तपासणी झाली की कळते की, चष्म्याचा नंबर निघालाय की नाही…! मात्र, त्यापूर्वी देखील चष्म्याचा नंबर असण्याची शक्यता असते. बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यात डोळे बर्यापैकी विकसित झालेले असतात. या दरम्यान डोळ्यांचा योग्य विकास झाला नाही तर चष्म्याचा नंबर लागण्याची शक्यता असते. लहान बाळांचे डोळे तिरळे दिसणे, सतत डोळे चोळणे, एक डोळा बंद केला की बाळाचे रडणे अशी काही लक्षणे दिसली तर अगदी लहान वयात डोळ्यामध्ये नंबर असण्याची शक्यता बळावते. येथे आपण लहान वय म्हणजे सहाव्या महिन्यापासून ते दहा वर्षांपर्यंतच्या बालकांसंबंधी बोलत आहोत.
लहानग्यांना चष्मा लागतोय म्हणजे त्यामागे केवळ टीव्ही वा मोबाईल हे कारण असावे, असा सर्वसाधारण समज आहे. अर्थात टीव्ही आणि मोबाईलचा अतिवापर, ही कारणे असले तरी चष्म्याचा नंबर लागण्यासाठी अन्य कारणे देखील तेवढीच महत्त्वाची आहेत.
लहान वयात चष्मा लागण्याचे पहिले कारण म्हणजे डोळ्यांचा योग्य विकास न होणे. डोळ्यांचा विकास योग्य पद्धतीने झाला नाही तर लहान वयात चष्मा लागू शकतो. अनुवांशिक परिस्थितीमुळे देखील डोळ्यांना नंबर लागू शकतो.
कंजिनायटल कॅटरॅक्ट म्हणजे जन्मतः असलेला मोतीबिंदू देखील लहान वयात चष्मा लागण्याचे एक कारण आहे. बाळ गर्भात असताना आई आजारी पडली व काही औषधांचे सेवन केले तर बाळाला जन्मतः मोतिबिंदू होण्याची शक्यता असते. याशिवाय तिरळेपणा हे देखील एक कारण आहे. बाळाचे डोळे तिरळे असण्याचे कारण चष्म्याचा नंबर फार मोठा असू शकतो. कारण योग्य फोकस नसल्याने डोळे तिरळे होतात. बाळाच्या जन्माच्या वेळी काही आघात झाला तर त्यामुळेदेखील तिरळेपणाची व पर्यायाने चष्म्याचा नंबर लागण्याची शक्यता असते.
मोबाईल आणि टीव्हीमधून निळ्या रंगाची प्रकाशकिरणे बाहेर येतात. ती सतत डोळ्यांवर पडली तर फोटो रिसेप्टर्सला धक्का बसतो. शिवाय फार वेळ टीव्ही जवळून पाहिल्याने डोळ्यांच्या स्नायुंचे (सिलेरी बॉडी) आकुंचन पावण्याची क्षमता हळू हळू लोप पावते. त्यामुळे देखील चष्म्याचा नंबर उद्भवू शकतो. कधी कधी लहानग्यांच्या डोळ्यांना अॅलर्जी असते. अशा वेळी डोळ्याला घाणेरडे हात लागले, डोळ्यात धुळ गेली आणि फार वेळ डोळे चोळले तर त्यामुळे देखील चष्म्याचा नंबर लागू शकतो. अश्रु तयार करणारी गंथी म्हणजे नेजोलॅक्रिमल डक्ट मधून तयार झालेले अतिरिक्त अश्रुचा निचरा नाकातून घशावाटे होत नसेल, तर डोळ्यातून सतत पाणी येते. त्यामुळे देखील डोळ्यांचा नंबर उद्भवतो. व्हिटॅमीन ए या पोषक घटकाची उणीव देखील चष्म्याच्या नंबरसाठी कारणीभूत ठरू शकते.
डोळ्यांना चष्म्याचा नंबर लागतोय, हे बहुतेकदा लहानग्यांना कळतच नाही. मात्र, पालकांना आपल्या पाल्यांचा सवयीवरून आणि व्यवहारावरून हे ओळखता येणे शक्य आहे. आपला पाल्य सतत डोळे चोळत असेल, त्यास उन्हाकडे बघताना त्रास होत असेल, वस्तूंवर फोकस करण्यास अवघड जात असेल, डोळ्यांची योग्य प्रकारे हालचाल होत नसेल व वस्तूंना बघण्यास अडचण जात असेल, किंबहुना आई-वडिलांना ओळखण्यास त्रास जात असेल, डोळ्यांमध्ये तिरळेपणा दिसत असेल, बुब्बुळं पांढुरकी दिसत असतील, एक डोळा बंद केला तर बाळ रडत असेल, वाचन करताना पुस्तक फार जवळ धरत असेल, मागील बाकावर बसून फळ्यावरील स्पष्ट दिसत नसेल आणि यासोबतच वह्यांमध्ये स्पेलिंगच्या चुका आढळत असतील, अशी लक्षणे आढळली तर कदाचित डोळ्यांची समस्या असू शकते आणि लहानग्यांना चष्म्याचा नंबरही लागू शकतो. वरील लक्षणे आढळली तर तातडीने नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे क्रमप्राप्त आहे. हाताच्या आणि डोळ्यांच्या स्वच्छतेकडे लक्षणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. धुळीच्या सानिध्यात जाण्याचे टाळणे, डॉक्टरांनी अॅलर्जीसाठी कुठला ड्रॉप दिला असले तर तो चुकवू नये. मोबाईल आणि टीव्हीचा वापर कमी करावा. बालकांना मोकळ्या मैदानात खेळण्यास पाठवावे, त्यामुळे देखील दृष्टी विकसित होण्यास मदत होते. व्हिटॅमीन ए युक्त आहार म्हणजे हिरव्या पालेभाज्या, मासे, सुकामेवा, अंडाच्या पिवळा गर याचे सेवन करावे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेल्या नंबरचा चष्मा नियमित लावावा. अन्यथा ‘लेजी आय’ सारखा विकार संभवतो आणि त्यामुळे डोळा नेहमीसाठी कमजोर होऊ शकतो. सगळ्यात शेवटी लहान मुलांची सहा ते आठ महिन्यात नेत्रतपासणी केली तर डोळ्यांच्या संदर्भातील गुंतागूंत टाळता येईल.
डॉ. नीता राठी, नेत्ररोगतज्ज्ञ, नागपूर
(Regular Eye Care is important to prevent severe eye problems; Article by Dr. Nita Rathi)